DNA मराठी

Stock market scam – शेअर मार्केट घोटाळा आणि ‘लाचखोरी’च्या आरोपांचे सावट

stock market scam the shadow of stock market scam and allegations of bribery

Stock market scam – अहिल्यानगर – शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेअर मार्केट घोटाळा ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर सामाजिक आणि नैतिक पातळीवरचा गंभीर विश्वासघात आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त केली. बँकेतील ठेवी, सोनं, जमिनी, विवाह व शिक्षणासाठी साठवलेले पैसे – सगळे पैसे काढून नागरिकांनी लोभाच्या आमिषाखाली आपलं भविष्यच पणाला लावलं.

मोठ्या व्याजाचे स्वप्न दाखवून आरोपींनी केवळ पैशांचा नव्हे, तर लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतला. व्यापारी पेठा सुमारे २५ टक्क्यांनी ठप्प झाल्या, स्थानिक अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला. शासन व प्रशासनाकडे वारंवार धाव घेतल्यानंतरच गुन्हा नोंदवला गेला.

परंतु, गुन्हा नोंदवल्यानंतरच एक नवा वाद पेटला – एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने, एका पोलिसाने ऑनलाइन एक कोटी रुपयांची लाच घेतल्याची चर्चा जोर धरू लागली. हे आरोप सत्य-असत्य असले तरी, अशा चर्चेमुळे लोकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होतो. फसवणूक प्रकरणात न्याय मिळेल, अशी जी आशा नागरिकांनी ठेवली, ती अशा आरोपांमुळे अशा संपत चाली आहे.

या प्रकरणातील खरे गुन्हेगार कोण, प्रशासनातील कोण कोण यात सामील होते, आणि लाचखोरीच्या चर्चेमागचं सत्य काय – हे सर्व तपासून पारदर्शकतेने जनतेसमोर मांडणं हे शासन आणि पोलीस यंत्रणेचं कर्तव्य आहे. अन्यथा, ‘गुन्हेगारांना संरक्षण’ अशी जनमानसातील भावना आणखी बळावेल.

लोकांच्या मेहनतीचा पैसा आणि भावनांचा गैरवापर करून आर्थिक ‘सुनामी’ घडवणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षा आणि भावी काळात अशा प्रकारांना आळा घालणारी व्यवस्था उभी करणं हा एकमेव उपाय आहे. कायदा आणि प्रशासनातील विश्वास पुनर्स्थापित करणं आजची अत्यावश्यक गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *