DNA मराठी

Pratap Sarnaik : पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

pratap sarnaik

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये 100% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर 8,000 किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी असे मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांना जिल्हा व तालुका पातळीवर देखील सेवा देता येईल.