Siddharam Salimath : ग्राहकांच्या असलेल्या अडी-अडचणी व प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून समन्वयाने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत नाही ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्राहकांच्या विद्यूत विषयक समस्या सोडविण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर ऊर्जामित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने या तारांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी. अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णहक्क सनद तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतचे फलक लावण्यात यावेत. ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत. रिफ्लेक्टर न बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचनाही सालीमठ यांनी यावेळी केल्या.
बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुऱ्हाडे, विलास जगदाळे, रणजित श्रीगोड, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर उपस्थित होते.