DNA मराठी

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगरपरिषदेत भाजपचा मास्टरस्ट्रोक अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का

shevgaon municipal council

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगर परिषदेतील सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात  बुधवारी (ता.21) सकाळी 11 वाजता पार पडलेल्या नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडीत भाजपने राजकीय डावपेचांचा कुशल वापर करत नगर परिषदेत आपले वर्चस्व निर्माण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरदचंद्रजी पवार गटातील अंतर्गत फूट आणि सतत बदलणाऱ्या आघाड्यांचा फायदा घेत भाजपने निर्णय भूमिका घेतल्याने सभापतीच्या निवडीच्या वेळेस राजकीय गणित तयार झाले.

शेवगाव शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माया अरुण मुंडे (शिवसेना) होत्या, तर मुख्याधिकारी विजय घाडगे उपस्थित होते. सभापतीपदाच्या निवडीत भाजपचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 2 नगरसेवक भाजपसोबत आल्याने नवीन राजकीय आघाडी उदयास आली. अवघ्या आठवडाभरापूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत मात्र पूर्णतः वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने भाजपला डावलत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) यांच्याशी आघाडी करत सिराजुद्दीन पटेल यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले होते.

या घडामोडीमुळे भाजपला राजकीय धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने समित्यांच्या निवडीत आक्रमक आणि नियोजनबद्ध पवित्रा घेतला. आमदार मोनिका राजळे यांनी या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावत राष्ट्रवादीतील फुटीचा राजकीय लाभ घेत दोन्ही गटांना सोबत आणले. परिणामी समित्यांच्या निवडीत भाजपचे वजन अधिक ठळकपणे जाणवले.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत एकत्र असलेली आघाडी आणि समित्यांच्या निवडीत झालेली वेगळी युती यामुळे नगरपरिषदेत नेमकी सत्ता कोणाच्या हाती, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सत्तेतील या उलथापालथीचा आगामी विकासकामांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *