या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली.
अहिल्यानगर – शनैश्वर देवस्थानच्या ( Shanaishwar Temple) नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट अॅप आणि संकेतस्थळांमुळे झालेल्या फसवणुकीप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाच यूआरएल धारकांसह (अॅप तयार करणारे) त्यांना साथ देणाऱ्या अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याने तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. देवस्थानच्या विश्वस्त मंडळासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी शनैश्वर देवस्थानच्या नावाने बनावट अॅप्स (Fake apps) व संकेतस्थळ तयार करून, देवस्थानची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ऑनलाईन पूजा, अभिषेक, तेल अर्पण, तसेच व्हीआयपी दर्शनासाठी नोंदणी सुरू केली होती. यामार्फत त्यांनी भक्तांकडून अनियमित शुल्क आकारले.
आरोपींनी स्वतःचे पुजारी नेमून हे व्यवहार सुरू ठेवले होते आणि यामार्फत अवैध मार्गाने पैसे उकळण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारातून शनैश्वर भक्तांची व देवस्थानची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी अॅप तयार करणाऱ्या यंत्रणेशी संबंधित युआरएल्स आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. यासोबतच, आरोपींना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या प्रकारामुळे सध्या भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, देवस्थानने अधिकृत अॅप अथवा सेवा सुरू केली आहे की नाही, याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्टता देण्याची मागणीही भक्तांकडून होत आहे.