Sawedi Plot Scam : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. सावेडी येथील गट क्रमांक २४५ मधील जमीन फेरफार प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. अहवालानुसार, १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्ताअंतर्गत झालेल्या फेरफार प्रक्रियेत न्यायालयाचा आदेश नसताना ३४ वर्षांनंतर नोंद घेण्यात आली.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
सदर खरेदी दस्ताच्या गावदप्तरी फेरफार नोंदी करताना तत्कालीन सावेडी मंडल अधिकारी जायभाय यांनी संबंधित खरेदीदार-खरेदीदारांना लेखी कळवले नसल्याचे नमूद आहे. तसेच शेती जमीन खरेदी करताना खरेदीदाराचा शेतकरी पुरावा न घेता थेट नोंद करण्यात आल्याची बाब उघड झाली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून, तत्कालीन सावेड मंडळाधिकारी दिलीप जायभाय यांना तत्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.