Satyajeet Tambe : संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे.
आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे सोयीचे नसून, अनेक गावांतील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना शहर ओलांडून पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुकला जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावाला सभागृहात तीव्र विरोध केला आहे. “जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित करणे, हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे.
प्रस्तावावर नागरिकांची नाराजी
संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने जनतेच्या सोयीसुविधांचा विचार न करता हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.