Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने भर दिवसा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा गवांडे असे मृत महिलेचे नाव आहे. ती पंपावर काम करत असताना सत्यम गवांडे याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला.
माहितीनुसार, पूजाचे यापूर्वी एक लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता.
मात्र, लग्नानंतर दोघेही एकत्र राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र, पूजाने यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांनी दिली.






