पुणे (खेड) | प्रतिनिधी पुण्याच्या खेड तालुक्यात खरपुडी गावात एका आंतरजातीय प्रेमविवाहाचे सत्र थेट हिंसक वळणावर गेले आहे. विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या नवदाम्पत्याने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
मात्र, समाज आणि कुटुंबीयांनी या विवाहाला स्वीकारले नाही. याच रागातून भरदिवसा प्राजक्ताच्या नातेवाइकांनी घरात घुसून विश्वनाथला बेदम मारहाण केली, तर प्राजक्ताचे जबरदस्तीने अपहरण केले.
घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, ‘सैराट’सारख्या प्रसंगाची आठवण जागवणारा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
पोलिसांकडून तातडीची कारवाई
खेड पोलिसांनी या प्रकरणी १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले असून, त्यामध्ये प्राजक्ताची आई, भाऊ आणि काही नातेवाईकांचा समावेश आहे. पोलिसांकडून अपहृत महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तपासात लक्ष घातले आहे.
सामाजिक पातळीवर संताप
या घटनेने पुन्हा एकदा आंतरजातीय विवाहांमागील सामाजिक असहिष्णुतेचा चेहरा उघड केला आहे. संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचा अशा घटनांमुळे विपर्यास होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.