Rohini Khadse : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई – पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुंबई – पुणे परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हवं तर केंद्राशी बोलून यावर तोडगा काढावा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.
तर गेल्या अकरा दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात भारताला बसताना दिसत आहे. देशातील अनेक ठिकाणी गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर आता या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे.






