Lagnacha Short : मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर व प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘रेशमी बंध’ या गाण्यात अभि आणि कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणात उमलणारं त्यांचं नातं, नजरेतून व्यक्त होणारी ओढ आणि एकमेकांच्या सहवासात वाढणारी जवळीक या गाण्यात अत्यंत सौम्य आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे.
निसर्गसौंदर्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे हे गाणं अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या गाण्याचं संगीत आणि गीतलेखन प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांनी केलं असून, केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांच्या मधुर स्वरांनी गाण्यात अधिकच रंगत आणली आहे.
दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, “ ‘रेशमी बंध’ हे गाणं अभि आणि कृतिकाच्या नात्याची पहिली ओळख आहे. ज्यात त्यांच्या खुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. अभि-कृतिकाची केमिस्ट्री, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य व गाण्याचे सुमधूर संगीत यामुळे प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”
महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.






