Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुढील एका वर्षासाठी शिंदे यांनी शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.: रवींद्र धंगेकर, माजी आमदार