Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणाऱ्या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली.
भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, महापौरपदासाठी भिवंडीच्या स्थानिक समितीकडून बहुमताने नारायण चौधरी यांचे नाव पाठविण्यात आले होते. त्यानुसार पक्षाकडून चौधरी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र बऱ्याच चर्चेअंती अखेर स्थानिक पातळीवर कुठल्याही स्वरुपाचे वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेश स्तरावर स्नेहा पाटील यांना पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.
चौधरी यांचे कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यासोबतचे स्थानिक पातळीवरचे मतभेद लक्षात घेता वाद टाळण्यासाठी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय प्रदेश स्तरावर पक्षहितासाठी घेण्यात आला. त्यानंतरही नाराज असलेल्या चौधरी आणि त्यांच्या बरोबरच्या नगरसेवकांनी बंडखोरी करू नये यासाठी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आले नाही असे चव्हाण यांनी नमूद केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना 46 मतं मिळाली आहे. तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली आहे.






