Rajya Sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीबाबतचर्चा करण्यात आली. बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आला आहे.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपली मते मांडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, तर शिवसेनेनेही आपली भूमिका स्पष्ट करतील अस वडेट्टीवार म्हणाले.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वजण आपापल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जागेसाठी आग्रह धरला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल. राज्यसभा अर्जासाठी 5 मार्चपर्यंत वेळ आहे. त्यामुळे मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
मालेगाव प्रकरणी प्रश्न विचारला असताना विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये, परंतु सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते.
या प्रकरणाचा विनाकारण वाद केला जात आहे, हे पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे. समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांना देखील सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.






