Raj Thackeray : पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार असून यासाठी राजकीय पक्षांकडून देखील वेगाने हालचाली पहायला मिळत आहे. यातच राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या या भेटीमागचे कारण आतापर्यंत गुलदस्त्यात असल्याचे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये तब्बल अर्धातास चर्चा झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीसोबत जाणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची असणार असल्याची देखील सध्या चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.