DNA मराठी

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert: जिल्ह्यात 28 मेपर्यंत वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात भिमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाटरस्त्याने शक्यतो प्रवास करणे टाळावे.

शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.