Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर वसुली आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुचके यांनी एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
युवकाला विश्रामगृहात बोलावून अपमानास्पद व धमकीची भाषा वापरल्याचे या ऑडिओत ऐकू येत आहे. यामुळे त्या लोकप्रतिनिधी आहेत की दबाव टाकणाऱ्या टोळीप्रमाणे वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तक्रारदार रोशन बिरमल यांनी आरोप केला आहे की, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे आशा बुचके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






