Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.
तातडीने पंचनामे करा
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.