land Scam Sawedi – अहिल्यानगर : सावेडी येथील तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारात नवे वळण आले आहे. या प्रकरणात बनावट खरेदीखताच्या आधारे पुन्हा एकदा नवीन खरेदीखत करण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी आर्थिक आमिषाचे – ‘लक्ष्मी दर्शनाचे’ – प्रस्ताव दिल्याचेही समजते.
सदर प्रकरणात २४५/ब२ या गट क्रमांकाची ०.६३ हेक्टर क्षेत्राची जमीन चर्चेचा विषय ठरली आहे. या भूखंडावर ३५ वर्षांपूर्वीचे खरेदीखत खरे की बनावट, याचा तपास सुरू असतानाच, त्याच खरेदीखताच्या आधारे नवी नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित पक्षांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नोंदणीसाठी दबाव आणल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेत अडथळा नको म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मी दर्शन’ देण्याचे सुचवले गेल्याचे संकेत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारी यंत्रणेवर बाह्य हस्तक्षेपाचा गंभीर प्रकार म्हणून पाहिली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित व्यवहाराची चौकशी सुरू केली असून, मंडळ अधिकारी शैलजा देवकते यांनी वादी-प्रतिवादी पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या गट नंबरवरील कोणताही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावा, असे आदेश सहाय्यक दुय्यम निबंधकांना दिले गेले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे भू-माफियांची धडकी भरली असून, प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रकार आणि त्याला मिळणारी शासकीय यंत्रणांची साथ, या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काळात ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.