Nirbhaya Squad : नवी मुंबईतील खारघर परिसरातील बेलपाडा येथे सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती पोलिस दलातील निर्भया पथकाच्या वाहनातून आला आणि वाहनातून उतरून काही नागरिकांना विनाकारण मारहाण करू लागला, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने त्यांनाही दम दिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
महिला अत्याचारासारख्या गुन्ह्यांवर कारवाई करणाऱ्या निर्भया पथकाच्या वाहनातूनच संबंधित व्यक्ती आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्ती खरोखर पोलीस कर्मचारी होता की इतर कोणी, तसेच त्याच्या ताब्यात हे वाहन कसे आले, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती काय दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






