DNA मराठी

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेत झालेल्या अंशतः बदल आणि स्थानांतरण प्रकरणावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झडत आहे. काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे बदल आदेश निघाले खरे, पण त्यामागचे राजकारण आणि व्यवहार आता उघड होऊ लागले आहेत.


खरेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या म्हणजे प्रशासनिक गरज, कारभाराचा कार्यक्षम भाग असतो. पण येथे चित्र वेगळे आहे. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणी पाठवण्यात आले जिथे जाणे त्यांना गैरसोयीचे वाटले.

त्यानंतर सुरू झाला दुसरा टप्पा — पुन्हा इच्छित ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची मनधरणी, फिल्डिंग लावणे आणि ‘लक्ष्मी दर्शन’! यामुळे बदल्यांचा हा खेळ एक नवा पायंडा पडतो आहे.

या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर आणि नीतिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे आणि “प्रमो रावसाहेब” सारख्या काही निवडक अधिकाऱ्यांसाठी अपवाद कसे? असा सवाल कर्मचारी वर्गात आणि सामान्य प्रशासनात उपस्थित होतो आहे.

सगळ्यांच्या बदल्या झाल्या, मग प्रमो राव साहेबांचे नाव बदल सूचीपासून दूर कसे राहिले? ही बाब केवळ आश्चर्यकारक नाही, तर शंका निर्माण करणारी आहे.

आज जिल्हा परिषदेच्या कारभारात असे दिसते की, बदल्यांचा निर्णय गरजेनुसार नव्हे तर देवाण-घेवाणीच्या गणितानुसार होत आहे. अशा प्रकारांमुळे खालच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे.

प्रश्न इतकाच आहे की, ही व्यवस्था कधी सुधारणार? बदल्यांचे पारदर्शक आणि ठोस धोरण तयार होईल का? की अशाच “व्यवस्था सैल आणि मनमानी पद्धतीने कारभार चालत राहणार का ? जिल्हा परिषद प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक व तटस्थ करण्याचे ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *