Lakshman Hake : ऊर्जा स्थळावर येऊन कोट्यवधी रुपयांचा निधी दिला म्हणजे काही वेगळे किंवा मोठे काम केल्याचा आव आणू नये, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला लावला आहे. तर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ऊर्जा स्थळावर येऊन सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी निधी दिला म्हणजे सरकारने उपकार केले, असे होत नाही. नेमके ओबीसींसाठी आणि दीन-दुबळ्यांसाठी राज्य सरकारने काय केले, हा खरा प्रश्न आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारकडून निधी दिल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी त्यातून ओबीसी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. केवळ निधी जाहीर केल्याने खूप काही केले, असे मानता येणार नाही, अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
लक्ष्मण हाके साताऱ्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर सरकारवर निशाणा साधला.
तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केला आहे. यानंतर मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील लक्ष्मण हाके करत आहे.






