Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.
निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.
संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.