Nilesh Ghaywal : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याने पासपोर्ट आणि व्हिसा सहज मिळवून परदेश गाठल्याने प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आल आहे. घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या अन बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या दोन नावांनी व दोन वयोगटात ओळखपत्रे मिळवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ओळखपत्रातील विसंगती
1. पती – निलेशकुमार बन्सीलाल गायवळ
• क्रमांक: DRD1360288
• मतदारसंघ: कोथरूड, पुणे
• दाखवलेले वय: 47
2. पती – निलेश बन्सीलाल गायवळ
• क्रमांक: TKM8217994
• मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर
• दाखवलेले वय: 48
3. पत्नी – स्वाती निलेश गायवळ
• क्रमांक: SAO7387947
• मतदारसंघ: कोथरूड, पुणे
• दाखवलेले वय: 42
4. पत्नी – स्वाती निलेश गायवळ
• क्रमांक: TKM8218026
• मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर
• दाखवलेले वय: 33
अहमदनगर व पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने व वयात बदल करून ही ओळखपत्रे मिळवण्यात आली. इतकेच नव्हे, तर कर्जत-जामखेड मतदारसंघात घायवळ दांपत्याची नावे सलग क्रमांकावर नोंदवली गेल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ नावातील फेरफार व खोट्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, घायवळ हे सर्व कुणाच्या आश्रयाने करतो? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दुहेरी ओळखपत्रे बनवली गेली? हे प्रश्न आता पुढे येत आहेत. यामुळे त्याच्या जवळील असलेल्या राजकीय मंडळींवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रशासन किती गांभीर्याने घेत आणि काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.