DNA मराठी

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले

sunil tatkare

Sunil Tatkare: तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या निवडणुकीला सज्ज झाला असून आता राज्य व जिल्हास्तरावर महायुती म्हणून सामोरे जात असताना कशाकशापध्दतीने सामोरे जायचे हे ठरवायचे आहे.यासंदर्भात पुढील तीन दिवसात चर्चा होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

पालघर, ठाणे शहर, ग्रामीण मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी या जिल्हयांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्या- त्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री, आमदार, माजी खासदार उपस्थित होते.

सोमवारपासून सुरू झालेल्या या बैठकांना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते ती माहिती सर्वांनी सादर केली. आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची आणि माझी चर्चा झाली. त्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रीमंडळाची बैठक झाल्यावर समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आम्ही ज्या भावना जिल्ह्याने मांडल्या त्या मला ज्ञात आहेत.

शिवाय भाजप – शिवसेनाच्याही बैठका झाल्या. त्यांच्या नेत्यांना त्या ज्ञात आहेत.त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत आम्ही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या त्या महायुती म्हणून ठरवणार आहोत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जी काही राजकीय समीकरणे आहेत ती समजून घेत आहोत. त्यामुळे जाहीर झालेल्या निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निवडणूकीच्या मोडवर गेले आहेत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने जाहीरपणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती नको असे त्यांच्या तिन्ही आमदारांनी आणि जिल्हाप्रमुखांनी मत व्यक्त केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही जाहीरपणे याबद्दल मत व्यक्त केलेले नाही आणि कधी केलेही नव्हते. अजितदादांसमोर रायगड जिल्हाध्यक्षांनी याबद्दल सर्व माहिती दिली ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही रायगडमध्ये बायकॉट करण्याचा संबंधच नाही. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची भूमिका रायगड जिल्हयात मांडलेली आहे. त्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिली आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहे त्यामूळे योग्यवेळी योग्य निर्णय होईल असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

भाजप आणि शिवसेनेसोबत वेगवेगळ्या पातळीवर संवाद सुरू आहेच. रायगड पुरते बोलायचे झाले तर रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणार नाही अशी उघड भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *