Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची पकड यामुळे ‘दादा’ हे केवळ एक व्यक्तिनाम न राहता एक राजकीय प्रवाह बनले होते. मात्र त्यांच्या पार्थिवाचे विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जी घाई सुरू झाली, ती केवळ अस्वस्थ करणारीच नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरते.
स्वर्गीय अजित पवार यांच्या जाण्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे चार नेते अचानक केंद्रस्थानी आले. प्रश्न असा की, इतक्या वेगाने निर्णय घेण्याची गरज नेमकी कुणाला आणि का भासली? शोक, आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक संवाद याऐवजी सत्तेची घाई दिसणे, हेच या साऱ्या प्रक्रियेचे भयावह वास्तव आहे.
खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र यावेत, ही इच्छा शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही होती. त्या दिशेने प्रयत्नही झाले होते. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाण्यास या चौघांचा ठाम विरोध होता, हे आता उघडपणे समोर येत आहे. मग प्रश्न उरतो हा विरोध राजकीय मतभेदांचा होता की वैयक्तिक भीतीतून जन्मलेला?
आज सुमित्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही जाऊ शकते. अजित पवार यांचा कणखरपणा, निर्णयातील ठामपणा आणि संघर्ष करण्याची वृत्ती सुमित्रा पवार यांच्यात कितपत उतरते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढे निश्चित की त्यांच्यासमोरचा रस्ता सोपा नाही.
या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक गोंधळात टाकणारा मुद्दा म्हणजे या चार नेत्यांना नेमकी कसली भीती वाटते? अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत यासाठी पडद्यामागे प्रयत्न झाले, भाजपाचा हात धरला गेला, हेही आता लपून राहिलेले नाही. दादांचा निर्णय मात्र वेगळा होता. पक्ष स्वबळावर उभा राहावा, हीच त्यांची भूमिका होती.
आज मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटात नेतृत्वाचा ठोस चेहरा दिसत नाही. उलट पक्ष ‘कोणी चालवत आहे’ यापेक्षा ‘कोणाच्या दबावाखाली चालतो आहे’ असा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येतो. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या चौघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भाजपाच्या राजकीय चौकटीबाहेर जाण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. परिणामी, हा पक्ष स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याऐवजी भाजपाच्या छायेत चालेल, अशी भीती वाटणे साहजिक आहे.
दरम्यान, सुमित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीची माहिती शरद पवार यांना नव्हती, असा त्यांचा दावा आहे. हे खरे असेल तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या तरी पडदा पडतो. संवादाऐवजी अविश्वास, समन्वयाऐवजी सत्तासंघर्ष आणि वारशाऐवजी स्वार्थ अशी ही सध्याची स्थिती आहे.
अजित पवार यांचा राजकीय वारसा केवळ पदांनी जिवंत राहत नाही;तो मूल्यांमधून, निर्णयांमधून आणि स्वाभिमानातून पुढे जातो. तो वारसा टिकवायचा असेल तर घाई नव्हे, धैर्य लागेल. अन्यथा, राष्ट्रवादीतील ही घडामोड इतिहासात एका संधीच्या अपव्यय म्हणूनच नोंदली जाईल.





