Honey Trap : नाशिक शहरात सध्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ती’ बुलावत होती, आणि तो गेला… मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ! सुरुवातीला तीन कोटी, नंतर थेट दहा कोटी रुपयांची मागणी झाली. अखेर प्रकरणाची वात खुलली, पण दोन्ही बाजूंनी लेखी तक्रार नाही. पोलिस मात्र संभ्रमात.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सापळ्यात अडकवून, त्याच्याकडून प्रथम तीन कोटी रुपये उकळण्यात आले. पण हे पुरेसे न वाटल्याने पुन्हा दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ‘ती’ महिला थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. सुरुवातीला तोंडी तक्रार करण्यात आली, त्यानंतर काही दिवसांनी लेखी तक्रारीसाठी ती पुन्हा आली.
दरम्यान, संबंधित अधिकारी याच काळात ठाणे येथे गेले असताना त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे समजते. तिथेच त्यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. पण काही दिवसांतच दोघांनीही परस्पर समजुतीने तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे पोलिस यंत्रणा संभ्रमात आहे. कोणतीही अधिकृत तक्रार नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करणे कठीण ठरत आहे. या प्रकरणात काही बड्या नावांचा समावेश असल्याचीही कुजबुज सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये तपास करून त्या हॉटेलची खोली सील करण्यात आली, अशी चर्चा रंगली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी याचा अधिकृत इन्कार केला आहे. सध्या त्या मजल्यावर प्रवेश बंद करण्यात आला असून, परिसरात संशयाचे वातावरण आहे.
प्रकरणाचा पुढचा रंग काय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी ‘हनी ट्रॅप’च्या गूढ गर्तेत प्रशासनही अडकले आहे, हे निश्चित.