Raj Thackeray: पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाडिया कॉलेज परिसरात ABVP ने ‘बायकॉट मनविसे’ अशी पोस्टर्स लावल्याचा आरोप करत मनविसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या निषेधार्थ मनविसे कार्यकर्त्यांनी टिळक रोडवरील ABVP च्या पुणे कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार आंदोलन केले.
मनविसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ABVP जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनीही त्यांच्या बंद कार्यालयाबाहेर प्रतिउत्तरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यामुळे पुण्यात दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाचे वातावरण चिघळले आहे.
दरम्यान आता यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली असून पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती कृषिकेश रावले,पोलीस उपायुक्त झोन-1 यांनी दिली.