Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.