Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढतात दिसत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री रिक्षा, कार, स्कूल बससह 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.