Utter Pradesh Crime: मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाणखरपूर बसेला गावात, एका सुनेने आपला प्रियकर आदिल याच्याशी संगनमत करून सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना 3 मार्चच्या रात्री 1 च्या सुमारास घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, सासूने सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर दोघांनी सासूच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा गुदमरून जीव घेतला. त्यानंतर, सुनेने आपल्या पतीला फोन करून सासूला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा कट रचला, ज्यामुळे कुटुंबाने मृतदेह दफन केले. मात्र
मृत महिलेच्या पतीला संशय आल्याने, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण मानेचे हाड मोडणे आणि गुदमरणे हे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रचला कट
पोलिसांच्या चौकशीत असे उघड झाले की, सदर सुनेचे त्याच परिसरात राहणाऱ्या आदिल नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. 3 मार्चच्या रात्री जेव्हा आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला होता, तेव्हा सासूला जाग आली. त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहताच, सासूने यावर आक्षेप घेतला. आपला हा प्रकार उघडकीस येईल या भीतीने, प्रियकर आणि सुनेने संगनमत करून सासूचा जीव घेण्याचे ठरवले त्यांनी सासूच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर उशी दाबून धरली, जोपर्यंत तिचा श्वास पूर्णपणे थांबला नाही.
“हार्ट अटॅक”चा बनाव
हत्येचा हा प्रकार लपवण्यासाठी सुनेने एक कपटी योजना आखली पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या पतीला फोन केला आणि त्याची आईला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा खोटा दावा केला. कोणताही संशय न आल्याने, कुटुंबाने मृतदेहाचे दफन केले. मात्र, मृत महिलेच्या पतीला नंतर काहीसा संशय आला आणि त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून दफन केलेली जागा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेतूनच या खळबळजनक हत्येमागील सत्य समोर आले.
सत्य उघडकीस आणि आरोपींची अटक
एसएसपी (SSP) यांनी स्पष्ट केले की, शवविच्छेदन अहवालाने सुनेने रचलेली खोटी कहाणी पूर्णपणे खोडून काढली आहे. या अहवालातून हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, त्या महिलेचा मृत्यू मानेचे हाड मोडल्यामुळे आणि गुदमरल्यामुळे झाला होता. पोलिसांनी तातडीने पावले उचलत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सून व तिचा प्रियकर आदिल या दोघांनाही अटक करून, त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली.






