Manikrao Kokate : सर्व समावेशक पीक विमा योजनेंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित 379 कोटी रक्कम विमा कंपनी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल आणि माझा बळीराजा सुखावेल, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री अँड. माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी व्यक्त केला. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या विमा हप्त्यासाठी तब्बल 1028.97 कोटी रुपयांची मंजूरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2024 साठी आतापर्यंत 3907.43 कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यासाठीचे 3561.08 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी 346.36 कोटी प्रलंबित होते. कृषी मंत्री कोकाटे यांच्या सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेत याचा सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तवास वित्त विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य शासनाने राज्य विमा हप्त्याचे 1028.97 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या पिक विमा पोर्टलद्वारे सदर कार्यवाही पूर्ण होईल.
कृषी (Agriculture Minister) मंत्र्यांच्या सजगतेमुळे आता पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई व काढणी पश्चात नुकसान भरपाईचे प्रलंबित 379 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा होतील. याबाबत शेताकऱ्यांना काही अडचणी आल्यास आपल्या विभागाशी थेट संपर्क करण्याचे आवाहन कृषी मंत्री कोकाटे यांनी केले आहे.