Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती.
पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो?
या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे.
आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते.
हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत.
म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.