Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.