Ahilyanagar News : जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा वावर असून सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या वेळी शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे.
ऊसतोड सुरू असताना शेतकरी आणि मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा मुलांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला सोडले जाते. अशा वेळी मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन एखाद्या मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येईल. फार वाकून ऊसतोड करू नये; कारण अशा वेळी दुसरा एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो.
ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डर किंवा वायरलेस ब्लूटूथ स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात गाणी लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते.
ऊसतोड किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समूहाने काम करावे. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळवण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये.
बिबट तसेच त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.






