DNA मराठी

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून  

Ahilyanagar Crime :  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संवत्सरजवळील रामवाडी येथे दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.  

खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *