Jio partners with Elon Musk’s SpaceX: देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने मोठा निर्णय घेत भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी स्पेसएक्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे आता जिओ ग्राहाकांना स्टारलिंकची उपग्रह-आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणार आहे. मात्र ही सेवा सुरु होणार की नाही. याबाबत निर्णय भारत सरकार घेणार आहे. जर सरकारने परवानगी दिली तर ही सेवा देशात सुरु होणार आहे. या सेवेमुळे भारतातील दुर्गम भागात हाय-स्पीड, कमी-लेटन्सी इंटरनेट प्रदान करण्यास मदत होणार आहे.
प्रत्येक गावात इंटरनेट
जिओ आणि स्पेसएक्समधील या भागीदारीअंतर्गत, जिओ त्यांच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे स्टारलिंक सेवा प्रदान करेल. यामुळे, भारतातील अधिकाधिक लोकांना सॅटेलाइट ब्रॉडबँड उपलब्ध होईल. या युतीचा उद्देश ज्या भागात आतापर्यंत ब्रॉडबँड सुविधा मर्यादित होत्या, जसे की गावे, शाळा, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम व्यवसाय केंद्रे, अशा ठिकाणी इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे.
जिओफायबरला अधिक मजबूत बनवेल
जिओ केवळ स्टारलिंक हार्डवेअर विकणार नाही तर ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी इन्स्टॉलेशन आणि अॅक्टिव्हेशन सपोर्ट देखील देईल. या भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्टारलिंकची सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जिओच्या विद्यमान ब्रॉडबँड सेवा जसे की जिओएअरफायबर आणि जिओफायबरला आणखी मजबूत करेल. यामुळे ज्या भागात पारंपारिक फायबर नेटवर्क टाकणे कठीण आहे तेथे हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणे शक्य होईल.
जिओचे ग्रुप सीईओ मॅथ्यू उमान यांनी या भागीदारीला भारतातील डिजिटल क्रांतीतील एक महत्त्वाचे पाऊल म्हटले. ते म्हणाले, ‘आमचे उद्दिष्ट प्रत्येक भारतीयाला, तो देशात कुठेही राहत असला तरी, हाय-स्पीड आणि परवडणारे इंटरनेट प्रदान करणे आहे.’
स्पेसएक्ससोबतची आमची भागीदारी जिओच्या या मोहिमेला आणखी बळकटी देईल. जिओच्या ब्रॉडबँड इकोसिस्टममध्ये स्टारलिंक जोडून, आम्ही देशभरात कनेक्टिव्हिटीची व्याप्ती वाढवत आहोत.
स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि सीओओ ग्विन शॉटवेल यांनीही या भागीदारीचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या जिओच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.’ अधिकाधिक लोक, व्यवसाय आणि संस्था स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेटशी जोडता याव्यात यासाठी आम्हाला जिओसोबत काम करण्याची आणि भारत सरकारकडून आवश्यक त्या मंजुरी मिळविण्याची उत्सुकता आहे.
जरी हा करार जिओ आणि स्पेसएक्समध्ये झाला असला तरी, भारतात स्टारलिंकचे अधिकृत प्रक्षेपण अजूनही भारत सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल. यासाठी, भारताच्या दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि अधिकृतता केंद्र (IN-SPACE) कडून परवानगी घ्यावी लागेल.