IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला.
अक्षर पटेल कर्णधार होणार?
तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.
मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.