Jayant Patil :- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान मागच्याच आठवड्यात त्यांनी कंत्राटदारांच्या आत्महत्यांची भीती व्यक्त केली होती.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान जयंतराव पाटील म्हणाले होते की, अनेक कंत्राटदारांची बिले थकीत आहेत. कंत्राटदारांची थकीत देणे देऊन टाका अन्यथा त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल. सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये वेगळे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे तात्काळ निर्णय घ्या. पण शासनाने त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही.
आता सांगली जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षल पाटील (वय 35, रा. तांदूळवाडी, ता. वाळवा) यांनी शेतात गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली.
शासनाकडे सुमारे दीड कोटीचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केला आहे.
मृत पाटील यांचे शासनाकडे जवळपास 1.40 कोटींची देयके प्रलंबित होती. तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास 65 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे आर्थिक विवंचना व देणेकऱ्यांचा तगादा यातून तरुण अभियंत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.