Sawedi land Scam अहिल्यानगर – मौजे सावेडी (ता. जि. अहिल्यानगर) येथील स. नं. २४५/ब२ संदर्भात तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा फेरफार क्रमांक ७३१०७ बेकायदेशीररित्या मंजूर केल्याचा आरोप उघड झाला आहे. याप्रकरणी कोणताही सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना, कुळकायद्याचा भंग करत तसेच पूर्वी मंजूर झालेल्या फेरफार व खरेदीखत रद्द न करताच हा फेरफार मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सत्यशोधक चौकशी करून संबंधित फेरफार त्वरीत रद्द करण्यात यावा, यासाठी मंडळाधिकारी, सावेडी, अहिल्यानगर यांनी दि. १० जुलै २०२५ रोजी तातडीचा पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना निर्देश दिले गेले आहेत. सदर नोटीस महसूल अधिकारी, सावेडी यांचेमार्फत पाठवण्यात आली आहे.
संदर्भात उल्लेख केलेले दस्तावेज — दस्त क्र. ४३०/१९९१, दिनांक १५/१०/१९९१ — नुसार, स. नं. २४५/ब१ (क्षेत्र ०.७२ हे.आर.) आणि स. नं. २४५/ब२ (क्षेत्र ०.६३ हे.आर.) या मिळकतींची विक्री झाल्याचे नोंदवले गेले. मात्र, दिनांक १७/०५/२०२५ रोजी फेरफार क्र. ७३१०७ नोंदवून पारसमल मश्रीमल शाह यांचे नाव बेकायदेशीरपणे नोंदवले गेले, असा दावा करण्यात आला आहे.
हा फेरफार गैरप्रकाराच्या आधारे मंजूर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, यावर मा. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील अहिल्यानगर यांच्याकडे चौकशीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदर अर्ज दि. ४ जुलै २०२५ रोजी मंडळाधिकारी शैलेजा देवकते याच्या कार्यालयास प्राप्त झाला आहे.
चौकशी प्रक्रिया सुरू असून, सर्व संबंधितांनी १६ जुलै २०२५ रोजी आवश्यक कागदपत्रांसह मंडळाधिकारी शैलेजा देवकते सावेडी, तहसिल कार्यालय, अहिल्यानगर येथे उपस्थित राहावे, असे वादी आणि प्रतीवादी यांना स्पष्टपणे कळविण्यात आले आहे.
याचबरोबर, अंतिम निर्णय होईपर्यंत कोणताही खरेदी-विक्री दस्त नोंदवू नये, अशी स्पष्ट पत्र मंडलधिकारी शैलेजा देवकते यांनी सर्व दुय्यम निबंधकांना कळवण्यात आले आहे. त्यामुळे सदर जमिनीवरील कोणतेही प्रांत अधिकारी यांचा निर्णयाय होई पर्यंत सध्या स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारा ठरत असून, जमीन व्यवहारातील पारदर्शकता व महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.