Public Safety Act : महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात घोषणा देत हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
आघाडीचे नेते म्हणाले की, “विधेयक हे हुकूमशाही वृत्तीचे आहे. सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी याचा अस्त्रासारखा वापर होऊ शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी आधीच कठोर कायदे अस्तित्वात असल्याचे सांगत, हा नवा कायदा अनावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अदानीसारख्या भांडवलदारांचे रक्षण करण्यासाठी व त्यांच्याविरोधात कोणतेही आंदोलन होऊ नये यासाठी सरकारने हा कायदा आणल्याचा आरोप नेत्यांनी केला.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. या वेळी काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड, माजी आमदार अशोक जाधव, भाकपाचे खजिनदार संदीप शुक्ला, अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव, माजी नगरसेवक रघुनाथ थवई, प्रवक्ते अर्शद आझमी, तसेच आनंद यादव, जयवंत लोखंडे, रोशन शहा, राजेश इंगळे, कृपा शंकर सिंग, निलेश नानचे आणि माकपाचे पदाधिकारी यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते व स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.