Dnamarathi.com

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती.

पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत.

दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे. 

अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती

कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे?

दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो?

दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे.

पनीर आणि अंड्याची तुलना

अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते.

हाडे बळकट होतात

पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते.

या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो.

स्नायूंच्या निर्मितीसाठी

अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात. 

याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते.

त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे

त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *