Pune News : स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये प्रामाणिक पणाची सुद्धा कमी नाही. कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या तत्त्वांवर आयुष्य जगणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अशीच एक प्रामाणिकपणाची आणि पैशांचा लोभ नसणाऱ्या पुण्यातील कचरावेचक मंजू माने यांची कथेची पुण्यात जोरदार चर्चा आहे. सदाशिव पेठेत कचरा वेचत रोजची कष्टाची लढाई लढणाऱ्या अंजू माने यांचा प्रामाणिकपणा पाहून संपूर्ण परिसर थक्क झाला आहे.
20 नोव्हेंबरची सकाळ… साधारण सात वाजता अंजूताई नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा गोळा करत होत्या. त्याचवेळी रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली. ‘कशाची तरी औषधांची पिशवी असेल’ असा साधा अंदाज करून त्यांनी ती बॅग उचलून फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली. पण नंतर जे दिसलं ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकावी! बॅगेत औषधांसोबत तब्बल दहा लाख रुपये होते.
त्या क्षणी पैशाचा लोभ न होता, ‘ही कोणाच्या तरी आयुष्यभराची कमाई असेल’ एवढाच विचार अंजूताईंच्या मनात आला.
वीस वर्षांपासून या भागात कष्टाने काम करत असल्यामुळे त्यांना इथलं प्रत्येक घर ओळखीचं. त्यांनी लगेचच लोकांना विचारपूस सुरू केली. तेवढ्यात एक नागरिक अतिशय अस्वस्थ होऊन काहीतरी शोधताना दिसला. अंजूताईंनी त्याला बसवून आधी पाणी दिलं, शांत केलं… आणि त्यांची बॅग हरवली आहे का ते विचारलं. तोंडातून शब्दच फुटेना! खात्री पटल्यावर अंजूताईंनी ती बॅग त्याच्याकडे परत दिली पैशाचा एक नोटही कमी न करता.
या प्रामाणिकपणामुळे त्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं आणि आसपासच्या नागरिकांच्या मनात अंजूताईंबद्दल प्रचंड आदर. लोकांनी स्वखुशीने साडी, थोडी रोख आणि भरभरून कौतुक देत त्यांचा सत्कार केला. अंजू माने यांची ही कृती म्हणजे खरा मानवीपणा कसा असतो याचं जिवंत उदाहरण. कष्टाची कामं करत असली तरी मन मात्र सोन्यासारखं हीच पुण्याची खरी शान. लाखो रुपयांची हाव मनात न ठेवता पैशांची बॅग परत करणाऱ्या अंजुमाने यांनी खरे लखमोलाची माणसं कशी असतात याच दर्शन घडवलं….






