DNA मराठी

Eknath Shinde on Ram Sutar Death : ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड

ram sutar

Eknath Shinde on Ram Sutar Death : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले. त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली, असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अशा अनेक अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून ते सदैव आपल्यात जिवंत राहतील. वयाच्या 101 व्या वर्षापर्यंत कलेची साधना करणाऱ्या सुतार यांनी नवीन पिढीतील हजारो कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेचे विद्यापीठच हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *