Eknath Shinde On Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून माझ्या नावाने शिव्या आणि शाप दिले जात आहेत. मी काही छेडत नाही, पण एकदा छेडलं तर मग मीही सोडत नाही, अशा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिला.
एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच टोला लगावत म्हटले की, पावसात जसं बेडूक उगवतात तसा रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला आहे. तिन्ही वर्षांपासून माझ्यावर शिव्या-शाप आणि आरोपच सुरु आहेत. ‘चल मेरे भाई, हात जोडता हूँ’ हे गाणं आठवतंय,” असा टोलाही त्यांनी लगावला.
विश्वासघात केल्याची टीका
शिंदेंनी आठवण करून दिली की, 2014 मध्ये मुंबईचं महापौरपद फडणवीसांनी अर्ध्या तासात शिवसेनेला दिलं होतं. पण नंतर जेव्हा वेळ आली तेव्हा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांचे फोनही उचलले नाहीत, असा आरोप करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर विश्वासघात केल्याची टीका केली. मी कुणाचं ताट घेत नाही. आम्ही एक भाकर चार जण वाटून खाणारे लोक आहोत. मी ‘सोन्याचा चमचा’ कुणाला उद्देशून म्हटलं नाही. कोव्हिड काळात कोणी रुग्णांचे घास घेतले हे लोकांनी पाहिलंय.
उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत शिंदे म्हणाले, या सगळ्यांना केमिकल लोचा झालाय का काय? एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिव्या, दुसरीकडे फडणवीस यांना बुके. इतका द्वेष का? आपल्या भूमिकेवर ठाम राहात शिंदे म्हणाले, मी छेडत नाही पण कोणी छेडलं तर सोडतही नाही. सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही, आणि करणारही नाही.