Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपांची झोड उठवत आपली खदखद व्यक्त केली. प्रफुल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी सांगितले की, “हो, लोढा माझ्याशी बोलत होता. पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे, तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता.”
खडसे म्हणाले की, “गुलाबी गप्पा करण्याचं वय आता माझं राहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या विधानावर खोचक प्रत्युत्तर दिलं. त्यांनी महाजनांवर आरोप करत सांगितले की, “तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही.”
तसेच, खडसे यांनी महाजन यांच्यावर वैयक्तिक टीकाही करत, “तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्याइतकी देखील राहिली नसती,” अशी जहरी टीका केली. “माझ्या पाच चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी, एवढा दम आहे का?”, असा सवालही खडसेंनी थेट विचारला.
भाजपामधील आपला प्रवास आणि त्यांना झालेल्या अन्यायावरही खडसे भावनिक झाले. “मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज आरोप सिद्ध होऊनही काहीजण पक्षात आहेत, आणि आम्ही बाहेर फेकले गेलो,” असं म्हणत त्यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या.
“महाजन यांनी मला मंत्रीमंडळातून दूर ठेवण्यासाठी षड्यंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला.” “जोपर्यंत मी मंत्रिमंडळात होतो, तोपर्यंत महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं, म्हणूनच हे सर्व घडलं, असेही खडसे म्हणाले.