DNA मराठी

Devendra Fadnavis: महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

Devendra Fadnavis: केंद्र शासनाने देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातून नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अति दुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात. सर्व पोलीस चौकीमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात. नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलीस चौकी झालेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे.

अशा कार्यक्रमांमध्ये शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात यावा. येथील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिले.

राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसुत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार राज्यस्तर गठीत समितीची आढावा बैठक विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.  जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी पुढे आलेल्या गडचिरोली पोलिसांना एक कोटी रुपये बक्षीस देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. नक्षल चळवळीचा बिमोड करण्यासाठी चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. मंत्रालय स्तरावर गडचिरोली जिल्ह्यातील कुठलाही विषय आल्यास नियमानुसार त्याला प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे.

गडचिरोली येथे नवीन पोलीस अधीक्षक इमारतीचे काम सुरू करावे. या इमारतीसाठी निधी उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच पोलीस दलात 33 नवीन वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अप्पर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष) शीरिंग दोरजे, केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अतिरिक्त महासंचालक अजय शर्मा आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल यांनी बैठकीत सादरीकरण केले.

नक्षलवाद्यांनी आनंद साजरा केलेल्या ठिकाणीच पोलीस चौकीची निर्मिती

8 ऑक्टोंबर 2009 मध्ये भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 पोलीस जवान शहीद झाले होते. यानंतर नक्षलवाद्यांनी आनंद उत्सव साजरा केला, नक्षल्यांनी आनंद उत्सव साजरा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी नवीन पोलीस चौकीची निर्मिती केली आहे. यामुळे या भागात नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *