CWC Meeting: भाजपला धक्का देत लोकसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसचा उत्साह आता वाढत चालला आहे . यातच आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा यांच्यासह पक्षाचे इतर सदस्यही उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर विचारमंथन करेल आणि भविष्यातील रणनीतीवरही विचार करेल.
2019 च्या निवडणुकीत काँग्रेस 52 वरून 99 जागा वाढवत लोकसभेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे पक्षातील एका गटाचे मत आहे.
त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. दरम्यान, काँग्रेस लोकसभेतील नेत्याचे नाव ठरवणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय राहुल गांधी यांनी हे महत्त्वाचे पद स्वीकारावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विविध राज्यांतील प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करतील आणि संघटना मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवतील.
या निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड होऊ शकते. तर राहुल गांधी यांच्यासाठी केसी वेणुगोपाल, मणिकम टागोर आणि गौरव गोगोई यांच्यासह पक्षाचे खासदार हात वर करून विरोधी पक्षनेते निवडण्याची मागणी करू शकतात, असे सांगितले जात आहे.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी लोकसभेतील पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड करतात की अन्य कोणते नेते हे सोनिया गांधींवर अवलंबून आहे. काँग्रेसच्या घटनेनुसार, संसदीय पक्षाच्या अध्यक्षांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पक्षाच्या नेत्यांची नावे देण्याचा अधिकार आहे.
सध्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते आहेत. लोकसभेतील काँग्रेसचा नेता हा सभागृहातील विरोधी पक्षनेताही असतो. सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने आवश्यक संख्येने जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता राहुल गांधींवर मोठी जबाबदारी सोपवल्याची बाब समोर येत आहे. सोनिया गांधी आता राज्यसभेच्या सदस्य झाल्याची माहिती आहे. पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे हे सर्व CWC सदस्य आणि पक्षाच्या खासदारांसाठी हॉटेल अशोक येथे डिनरचे आयोजन करणार असल्याचीही बातमी आहे.