Crime News : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. ही धक्कादायक घटना गोंदिया रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी रात्री 8 वाजता दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे असे आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा वापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण
गोंदिया रामनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, तक्रारदार प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते.
तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता संतोष मानकर याने प्रवीण मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांच्यासोबतही भांडण व शिवीगाळ केली.
तसेच मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश, पवन संतोष जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी लोखंडी रॉड, कुन्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. प्रवीण मेश्राम याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्ह दाखल केलाय.
या प्रकरणात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले. यानंतर पथकांनी संतोष मानकर, लकी संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले, तर जॉर्डन शेंडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
आरोपीना अवघ्या काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात केले होते.