Farmers Relief Fund : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावसह जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो घरांची पडझड झाली होती. तर आता नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांना एकूण ₹८८०२३.६६ लाख रुपये (म्हणजेच सुमारे ₹८८०.२३ कोटी) भरपाई मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया दिली. तसेच बँकांनी ही भरपाई रक्कम कर्ज किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करू नये अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बँकांना दिला आहे.
५.७६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ तालुक्यांतील १,३११ गावांवर अतिवृष्टीचा फटका बसला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभं आहे. भरपाई वाटप प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही असं देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात घरांची पडझड (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर):
एकूण – ५,६९७ घरे
🔹 पाथर्डी – १,०२०
🔹 शेवगाव – ९२१
🔹 जामखेड – ९०६
🔹 नगर – ५२२
🔹 नेवासा – ५६५
🔹 राहुरी – ३९६
🔹 संगमनेर – २२७
🔹 राहाता – २०३
(इतर तालुके : अकोले, कर्जत, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर)
जनावरे व कुक्कुटधन हानी :
🔸 १,०५९ जनावरे दगावली
🔸 १३,८७९ कोंबड्या मृत
🔸 आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू






